गुरुवार, २१ जुलै, २०११

सरलं त्यात काय उरलं?

आयुष्याचं गणित कितीही जरी हेरलं
सरलं त्यात काय उरलं?  ॥धृ॥


दिवसामागुन दिवस जातो
सरीमागनं सरी 
संसाराच्या जंजाळात राहतो 
फक्त मोह उरी
उगणारंही संपतं, कितीही जरी पेरलं
सरलं त्यात काय उरलं?  ॥१॥

ढगामागून ढग जातो
ऊनसावली खेळत
थेंब थेंब वाहून जातो
बर्फापासून निखळत 
जग खालीच होईल,कितीही जरी भरलं
सरलं त्यात काय उरलं?  ॥२॥

माणुस माणुस वेगळा दिसतो
रक्त मात्र एक
तरिही का उंचावत जातो
जातीपातीचा आलेख
माणुस सदा रुसत जातो,कितीही मन धरलं
सरलं त्यात काय उरलं?  ॥३॥

मनं मनं दुभंगतात 
होउन जातात खाक
चिता जळुन जाते
राहते फक्त राख
आयुष्य शेवटपर्यंत कुणालाच नाही पुरलं
सरलं त्यात काय उरलं?  ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा