सोमवार, २ मे, २०१६

मराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट)

सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते "आज कुछ तुफानी करते है। ", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो म्हणजे "सैराट", "आज काही सैराट करुया.. ". मराठीतल्या एका बोली भाषेतला शब्द आजकाल बराच ओळखीचा झाला. का? कसा? हे आता सर्वानाच माहीत आहे. सैराटची कथा काय आहे?, कशी आहे? कोण कलाकार आहेत? या सर्व गोष्टी आता ठाऊक आहेतच. मुळात विषय हा आहे सैराटसारखा विषय घेउन या आधीही चित्रपट आले नाहीत काय ? हो आले आहे पण सैराट यशस्वी होण्यामागचे कारण आहे त्याला दिला गेलेला न्याय. न्याय ह्या अर्थाने म्हणता येईल की नागराज मंजुळे या लेखकाला पुर्ण स्वतंत्रता देऊन विषयाची मांडणी करु देणे आणि त्यालाच त्या कथेवर संवाद आणि दिग्दर्शन करु देणे. कथा खुप सामान्य असली तरी त्याची मांडणी उत्तम प्रकारे कशी करता येते हे नागराजने याआधी ’फॅंण्ड्री’ आणि आता ’सैराट’ या दोनही चित्रपटात दाखवुन दिले. मुळात लेखकाला ज्या वेळेस सर्व गोष्टिंचा वाव दिला गेला., जसे कि कास्टींग असेल, लोकेशन असतील, संवाद असतील, तर चित्रपट अधिक उजवा होऊ शकतो कारण ज्यावेळेस कुठलाही लेखक कथा लिहित असतो त्या वेळेस तो त्यातल्या भुमिका जगलेला असतो आणि प्रत्येक वेळेस वास्तवातल्या जगाशी तुलना केली जाते म्हणुनच नागराजने केलेली स्टार कास्टींग सरस ठरली.



वास्तववादी सिनेमा हा मराठी चित्रपट सृष्टिचा आत्मा म्हणावा लागेल., हॉलीवुड जितके वास्तवापलीकडे जाऊन विषय हाताळते त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टि वास्तवावर आधारित विषय हाताळते. तुलना यासाठी केली गेली बॉलीवुडमधेही असे सिनेमे बनतात पण त्या मागे जो मसाला भरला जातो तो वास्तवापेक्षा वेगळा असतो, अर्थात तिथे फक्त व्यावसायिकता जपण्यासाठी धडपड चालु असते. मराठी चित्रपट इंडस्ट्रीला हा विचार कधीच डोक्यात कधीच घ्यावा लागत नाही कारण मराठी रसिक हा सर्वार्थाने उच्चकोटिचा आहे, तो जर ’लय़ी भारी’ पाहतो तर तोच ’नटसम्राट’ ही डोक्यावर घेतो, तसेच तो ’फॅंण्ड्री’ सारख्या विचार करायला लावणार्‍या चित्रपटाला पण न्याय देतो. हाच तर मराठी प्रेक्षकाचा मोठेपणा आहे. ’सैराट’ सिनेमा वास्तववादी तर आहे पण आपण जर शुटिंग लोकेशन पाहिलेत तर लक्षात येते की फार काही बदल न करता जे आहे तसेच दाखवले आहे. बॉलीवुडमधे यश चोप्राच्या सिनेमात नयनरम्य असे काश्मीरचे नजारे घेतले असायचे अर्थातच तो भव्यदिव्य देखावा मन हुरळुन टाकणारा असायचा. महाराष्ट्रही काहि कमी नाही हे याआधी ’वळु’, ’देऊळ’ मधे पाहीलेच आहे, ’सैराट’ च्या निमित्तान पुन: एकदा नागराजने दाखवुन दिले की महाराष्ट्रात न सेट लावता शुटिंग करता येईल फक्त लोकेशन शोधन्याची नजर हवी आहे. शुटिंग लोकेशनच्या बाबतीत पण सिनेमा सरस ठरला हेच सांगायचे आहे.

मुळात सिनेमाचे तिकिटबारिवरचे यशही छान आहे. ३ दिवसात या फिल्मने जवळपास १२ कोटींचा गल्ला जमा केला आहे फार क्वचित वास्तवदर्शी सिनेमांना हा लाभ होतो. ’फॅंण्ड्री’ लाभलेले यश आणि त्याचा प्रमोशनसाठी खुबीने केलेला वापर, ट्रेलर बनवतांना दाखवलेली कल्पकता लाजवाब आहे आणि अजय-अतुल या व्दयीचे सुपरहिट संगीत सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेउन जाते. एकुणच काय तर फिल्म मेकिंगच्या बाबतीत म्हणाल तर एक नंबर आहे.

वरिल सर्व बाजु ह्या सिनेमाविषयी चांगल्या असल्या तरी संस्कृतीरक्षकांची ओरड तीही लक्षात घ्यावी लागेल., त्यांचे म्हणणे असे लागते की अशा फिल्म्समुळे बालवयातील प्रेमप्रकरणाचे उद्दातीकरण  होते. एक फिल्म जर नक्की इतका परिणाम करत असेल आणि बदल इतक्या झटक्यात होत असेल तर विचार करावाच लागेल पण ’फॅंण्ड्री’ फिल्म आल्यानंतरही जब्यासारख्या अनेकांना समाजाने सन्मान द्यायला सुरुवात केली असेही नाही, ’थ्री इडियट’ नंतर शिक्षणप्रणाली बदलली असेही नाही मग ह्या एका फिल्मने संस्कृतीरक्षकांनी गहजब का करावा हे विचारवंताना सांगण्याची गरज नाही.

थोडे नागराजबद्दल, फार थोडे लेखक कलाकृतीला योग्य न्याय देऊ शकतात. नागराजने दोनही फिल्म्सला तो दिला आणि मराठी चित्रपट सृष्टित आता ब्रॅण्ड बनला आहे. बाकी तो कुठल्या जात, समाज, धर्माचा आहे या सगळ्या गोष्टी गौण ठरतात त्याने जातीची चौकट मोडित काढुन अत्यंत प्रतिकूल परिस्थितित एका ग्लॅमरस दुनियेत आपले स्थान बनवले आहे तेव्हा आपणही आपल्या विचारांची चौकट मोडुन टाकु आणि सैराट होऊन जाऊ.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा