गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

माझ्या भाळी गळफास

मी खेळावे बागडावे
हि मातीला रे आस
किती करंटा रे मी
माझ्या भाळी गळफास

काबाड कष्ट हे
माझ्या पाची पुजलेले
चिखल मातीने रे
पाय रोज सजलेले
पण लेक मी मातीचा
कधी झाला नाही ञास
तरी करंटा रे का मी
माझ्या भाळी गळफास


शिवार फुलावे बहरावे
मन आस लागलेले
चिट पाखराने यावे
काल थवे भेटलेले 

दिस परत ते यावे 
हे उरी माझ्या ध्यास   
किती करंटा रे मी
माझ्या भाळी गळफास

किती सण आले 
किती सण गेले 
माझी लेकरं बिचारी 
फक्त शिमगा पाहिलेले
नको दिवाळी दसरा 
मिळो सुखाचे दोन घास 
किती करंटा रे मी
माझ्या भाळी गळफास