गुरुवार, २५ जून, २०१५

चांगले दिवस येतील, थोडी वाट आम्ही पाहू

चांगले दिवस येतील,
थोडी वाट आम्ही पाहू
तशी एकदा चाहुल द्या
सगळेच एका सुरात गाऊ


खुप काही लागत नाही
रोजच्या आमच्या जगण्यात
फक्त तुमची नजर फिरवा
सारे येऊ द्या एकदा बघण्यात

चाकरमाणूस रोजच उठतो
वेळ त्याला झुलवत राहते
रेल्वे असु दे वा बस
सकाळची वेळ त्यातच जाते

जवान असु दे वा किसान
रोजच लढाई लढतो आहे
एक गोळी झेलुन जातो
दुसर्‍याच्या दोरी गळ्यात आहे

समस्या कधी संपत नाही
फक्त रुप बदलुन येतात
सरकारं इथली बदलत जातात
आश्वासनं मात्र हवेतच राहतात

रांगा इथे रोजच लागतात
माणुस तिथेच हरवत जातो
कागदी घोडे नाचत म्हणतात
भारत कधी महासत्ता होतो!!!

आंदोलने पेटली नुसती
वारा फिरला तिकडे दिशा
कोण हरला कोण जिंकला
जिकडे तिकडे हिच नशा

भरडला गेला आम आदमी
धर्म जात कशाला पुसता
मन मारुन जगतात इथे
हाडामासाचा गोळा नुसता

कूणी नसणार आहे गॉडफादर
चला आपणच आपले उभे राहू
चांगले दिवस येतील,
थोडी वाट आम्ही पाहू

 

 

कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा