रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

शायरी(हिन्दी )-2

दर्द को छुपाये रखते हम लेकिन
आखों कि नमी कुछ और बयाँ कर देती
कितनी परायी हो चुकी हो तुम
कल तक तो हमारी आहट भी पहचान लेती


रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

सारेच धुसर झाले ते स्वप्न रंगलेले

मी शब्दात गुंफलेले
बंधात बांधलेले
सारेच धुसर झाले
ते स्वप्न रंगलेले

हळुवार आयुष्याचा
तु भाग होत गेली
मनोहर क्षणाची कितीदा
तू सोबती झाली
श्वास थांबलेला
आता सगळेच संपलेले
सारेच धुसर झाले
ते स्वप्न रंगलेले

आठवणीची उजळणी
कितीदा करून झाली
अजून दिसते आहे
ती सांजवेळ ओली
तुला कधी ना उमगले 
बोल अंतरीचे दाटलेले 
सारेच धुसर झाले
ते स्वप्न रंगलेले

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

शायरी(हिन्दी )-१

जहन मे हमारे कुछ भी नही था,
फिर भी हम किस्मत से खेले है
मंजुरे खुदा ने क्या चाहा,
आज मिलके भी उनसे अकेले है


गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

माझ्या भाळी गळफास

मी खेळावे बागडावे
हि मातीला रे आस
किती करंटा रे मी
माझ्या भाळी गळफास

काबाड कष्ट हे
माझ्या पाची पुजलेले
चिखल मातीने रे
पाय रोज सजलेले
पण लेक मी मातीचा
कधी झाला नाही ञास
तरी करंटा रे का मी
माझ्या भाळी गळफास


शिवार फुलावे बहरावे
मन आस लागलेले
चिट पाखराने यावे
काल थवे भेटलेले 

दिस परत ते यावे 
हे उरी माझ्या ध्यास   
किती करंटा रे मी
माझ्या भाळी गळफास

किती सण आले 
किती सण गेले 
माझी लेकरं बिचारी 
फक्त शिमगा पाहिलेले
नको दिवाळी दसरा 
मिळो सुखाचे दोन घास 
किती करंटा रे मी
माझ्या भाळी गळफास




शनिवार, २४ जून, २०१७

घास कष्टाचा भरव

किती जीव होते वेडे
सुक्या मातीत पेरलेले
राजा वरुणा रे तुझी
आस लागलेले

कण कण मातीमध्ये
कसा मिसळून गेला
तु दावी अवकृपा
मग अर्थ नाही त्याला


किती सोसला मातीने
वैशाख तापलेला
आज विरुन जावो
तो लाव्हा साचलेला

थेंब थेंब रे तुझा हा
मज आहे अनमोल
नको ओढ रे देऊ तु
होते जीवा घालमेल

कर मातीला ह्या ओलं
कर शिवार हिरवं
बहरू दे पिक सारं
घास कष्टाचा भरव

बुधवार, ८ मार्च, २०१७

कोण असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली

कोण असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली

इकडुन तिकडे धावत
सारखी घरासाठी राबणारी
प्रत्येकाच्या आयुष्याला
असते तिच सावरणारी
काटा रुततो आपल्या पायी
तरि तिची पापणी होते ओली
आई असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली

नातवांसाठी बटवा जिचा
खुला असतो नेहमी
असते आपल्यामधे ती
बनुन आळवावरचं पाणी
भरभरून देते आशिर्वाद
कधीच जात नाही खाली
आजी असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली

असते भोवती लुडबुड
धुडगूस असतो नेहमी
बडबड सुरूच असते
रोजचीच रडगाणी
तरीही आवडते ती
गोड गोजरी सानुकली
मुलगी असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली

रुसवा कितीदा असतो
नखरे किती हे भारी
आपल्याकडेच कितीदा
हट्ट करणारी
खुलते कळी पाहून 
जिच्या ओठावरची लाली 
प्रेयसी असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली

त्याग जिचा असतो मोठा
करते  किती तडजोडी
नवऱ्याघरी  जाताना
आईवडील सोडणारी
साथी असते नेहमी
कुंकवाची रखवाली
बायको  असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली

कधी दुर्गा, कधी चंडिका 
कधी असते रणरागिनी 
कधी लक्ष्मी, कधी अहिल्या,
कधी सावित्री हक्कासाठी लढणारी 
तुझ्यामाझ्याभोवती रोजच दिसते 
वेगवेगळ्या रूपात जगणारी 
स्त्री असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली


कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे