शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

अन प्रवास इथेच संपला !!! भाग ४

बाहेर पडणारा पाऊस आणि आत नव्या प्रेमकथेची सुरुवात सगळेच कसे जुळुन आले होते. आता याची तगमग वाढत चालली कारण लवकरच स्टॉप येणार होता. ’तिला बाय करावे का?; याच्या मनात विचार डोकावला, ’पण इतके सारे लोक आहेत, नको उगाच’ असा विचार करता करता नकळत हात केसांवर फिरवण्यासाठी वर केला आणि बाय असे म्हणनारी ओठांवरची पुसट हालचाल तिला दिसली तसे तिही ओठांवरचे हसु दाबत बाहेर बघु लागली. स्टॉपवर बस थांबली होती आणि नाइलाजस्तव का होइना याला उतरावे लागले. ’ती हसली का असेल, आणि रिस्पॉन्स पण काहिच दिला नाही सरळ बाहेर बघायला लागली’ नाही म्हट्ले तरी याचे मन खट्टु झाले होते. त्याला हि गोष्ट मित्रांना विचारावी वाटली पण काय करणार हा पोहचेपर्यंत ते सिटी बसने गेले पण होते.

याचे मन आज मात्र खट्टु झाले होते, ’का नसेल पाहिले तिने, खरच ती इतर जण म्हणतात तशी खडुस असेल,......... ओ नो!! मी खुप घाई करतो आहे का कुणाबद्दल मत ठरवत तर नाही ना.... मी  का विचार करतो पण इतका.’ समोर सिटी बस आली होती. गर्दिचा प्रवाह सरकला तसा हा पण त्या गर्दिचा भाग झाला. बस भरगच्च होऊन निघाली, कसेबसे महाशय दरवाज्याजवळ स्थिरस्थावर झाले.
इकडे बस मुख्य स्थानकावर आली होती. एव्हाना हि बस मधुन उतरली होती, कुणाची तरी वाट पाहत बाजुला थांबलेली. “ ए हाय , सॉरि सॉरि यार मला खुप उशीर झाला, तु कधी आलीस, खुप वेळेपासुन नाही ना....” रिया परिणीतीला येताच सर्व काही एका दमात विचारती झाली. “ नाही गं आताच आले मी, फार वेळ नाही झाला, बरं ऐक ना...” परिणीती तिला बोलती झाली. तशी रियाने स्माईल करत म्हणाली, “ हो बोल तु, पण त्या आधी ना तुला कालची गंमत सांगते, काल आई, बाबा बंटि अन मी शॉपिंगला गेलेलो....” रियाच्या चुलबुल्या स्वभवाप्रमाने ती जशी बोलायला लागली तशी कॉलेज अर्ध्या अंतरावर आले होते. हिच्या चेहर्‍यावर मात्र त्रासिक भाव जमा व्हायला लागले. “ ................इतकि धमाल केली तुला सांगते मी.” रियाने परिकडे पाहिले अन तिला लक्षात आले. “ ओ सॉरि अगेन यार तुला काही सांगायचे होते ना. बोल काय?”  “ जाऊदे मी नाही सांगत जा!” “ परि सॉरि ना यार, बोल ना आता काय झाले?” रिया विनवणीच्या सुरात बोलली. “ ओके सांगते ऐक, मी तुला काल बोलले होते ना तो कालचा किस्सा”, “हम्म्म, ओढणीवाला”, रियाची झटपट प्रतिक्रिया आली. “ हो ओढणीवालाच, तो आजपण होता बस मध्ये बघत होता, तशी मी पण बघत होते चोरुन अधुन मधुन. तसे खुप सारे मुलं बघतात गं दिवसभर आपल्याकडे, किती नजरा झेलतो आपण रोज आणि दुर्लक्ष करत जातो पण याचे कालचे वागणे आणि आजचे बघणे मला भावले असे वाटते. अन खरे सांगु मला तो एकदम साधा वाटला.” एव्हडे बोलुन तिने रियाकडे पाहिले. “ हे बघ मला तरि वाटते तु तुझ्या मनात लगेच मत बनवु नको. आणि काही मुले चेहर्‍याने साधी वाटतात पण ती तशी नसतात. बघ मी तुझ्या भल्यासाठी सांगते.” रिया बोलुन थांबली, तिच्या चेहर्‍यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. “ हो डियर, मी फक्त वाटले म्हणुन सहज बोलले, बरं चल लवकर लेक्चर सुरु होईल.” परिणीती अशी बोलली अन दोघीही कॉलेजच्या दिशेने चालत्या झाल्या.

 [क्रमश:]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा