रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

मी भ्रष्ट की,तू भ्रष्ट


मी भ्रष्ट की,तू भ्रष्ट
यात रोजच घेताहेत कष्ट
कष्टकरी मरतो आहे.....
राजकारणाचं मनोरंजन मात्र चविष्ट


भल्याभल्यांना जाण नाही
देश बापाची जागीर वाटतो
थेंबभर पाण्यासाठी मात्र
गळा आमचा रोजच दाटतो
यांच्यासाठी दुष्काळही सुकाळ आहे
हे अव्वल दर्जाचे नतद्रष्ट
मी भ्रष्ट की,तू भ्रष्ट
यात रोजच घेताहेत कष्ट॥१॥

कुणीतरी वाचाळ येतो
बकाबका बोलुन जातो
दुसरा येवुन तेच गुर्‍हाळ
पुन: चावुन चावुन खातो
इथुन तिथुन सगळं सारखं
काहीच होत नाही स्पष्ट
मी भ्रष्ट की,तू भ्रष्ट
यात रोजच घेताहेत कष्ट॥२॥

हवा,पाणी सोडलं नाही
माती सुद्धा विकुन खाल्ली
अकलेचे तारे तोडता तोडता
पैसा आला पण मती गेली
चाकर माणुस मरत आहे
पण हे रोजच होतात पुष्ट
मी भ्रष्ट की,तू भ्रष्ट
यात रोजच घेताहेत कष्ट॥३॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा