सोमवार, १२ डिसेंबर, २०११

सारे फक्त पाहत राहतात

वादळाची सुरुवात ही
होते घोंगावत्या अंधाराने
संकट आधी दिसत नाही
डोळ्यावरील झापडाने



सुर्य बावळा अंधाराला
जागा करुन देतो
काही वेळेपुरता ढग इथे
राज्य करुन जातो


भरकटलेली पाखरंही
आधार गवसत फिरतात 
घरटयातल्या चिमुकल्यांची
काळजी करत राहतात


तग धरुन राहतं गवत
मातीतल्या ओलाव्याने
मातीही घट्ट धरते त्याला
धडाडणार्‍या काळजाने


एकदाचे वादळवारे
सारे निघुन जातात 
उध्वस्त वैरान धरतीला
सारे फक्त पाहत राहतात 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा