मी रे तुळस अंगणातली आता असते अबोल
पैश्याशिवाय मानवा
ना दिले कशालाही मोल
मी रे तुळस अंगणातली
आता असते अबोल
होता जिथे सडा
काल होती जिथे माया
आता पाणी ओतसी झारीने
माझी सुकली रे काया
किती संसार पाहिले
किती गार्हाणे ऐकले
जीवाभावाची सखी मी
तुझे भोग मी सोसले
कधी थकला भागला
कधी उरले ना त्राण
तुझी रे मी संजीवनी
काल होती याची जाण
दुर दूर आज जाशी
तुला विसर रे माझा
डोळे आसुसती माझे
तुज पाहण्या रे राजा
ना उरले अंगण
ना उरली रे माती
लोक विखुरली आज
दूर गेली नातीगोती
कसा रे कृतघ्न
हिच माझ्या जीवा सल
मी रे तुळस अंगणातली
आता असते अबोल
कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा